Your Mental Wellness Matters
Mon - Sat | 10:00 AM - 6:00 PM

जाणीवपूर्वक आहार घेऊया. जेवताना मनात श्रद्धा आणि कृतज्ञता बाळगूया.

Author: Piyusha Samant | Published: 31 Aug 2026


जाणीवपूर्वक आहार घेऊया. जेवताना मनात श्रद्धा आणि कृतज्ञता बाळगूया.

आजकाल पचनसंस्थेचं आरोग्य (Gut health) वारंवार बिघडत चाललं आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी येणाऱ्या काही विद्यार्थी आणि जेष्ठांशी झालेल्या अलीकडील संवादांवरून माझ्या असं लक्षात येतंय की, पचनाच्या समस्यांमुळे लोकांना अनेकदा अस्वस्थता आणि शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. पूर्वी, जेवणापूर्वी प्रार्थना करण्याची, ताटाला नमस्कार करण्याची पद्धत होती; ही पद्धत आपल्याला असा विश्वास देण्यास मदत करायची की, आपण जे काही खातो त्याचं नक्कीच शरीरासाठी आवश्यक ऊर्जेमध्ये रूपांतर होईल. आजकाल आपल्या खाण्याच्या सवयी दिवसेंदिवस आरोग्यासाठी अपायकारक होत चालल्या आहेत.जेवताना फोनवर सोशल मिडिया वापर, टिव्ही या गोष्टीं नी कहर केलाच आहे शिवाय, खतं आणि कीटकनाशकांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. इंजेक्शन आणि रसायनं नकळतपणे आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत. आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींचा विचार करता, आपण केवळ एवढीच आशा करू शकतो की आपण खात असलेल्या अन्नामुळे पचनाच्या समस्या उद्भवणार नाहीत आणि ते पूर्णब्रह्म आपल्याला उर्जा पूरवत राहिल. अशा परिस्थितीत जेवणापूर्वी प्रार्थना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती जुनी आणि विचारपूर्वक केलेली पद्धत पुन्हा सुरू करणं आता गरजेचं आहे. शरीर स्वास्थ्यासोबत मनोबल वाढवणारी आपली पारंपरिक प्रथा केवळ देवभोळी कर्मकांडं नव्हती. आत्ताच्या शास्त्राला लाजवतील येवढा अभ्यास आणि मानवी जातीचं कल्याण त्यात होतं. केवळ सांस्कृतिक वारसा म्हणून नव्हे तर इथून पुढचे दिवस भल्याचे जावेत याकरता त्या परंपरांचे पाईक होऊयात. अन्नाचा आदर, त्याच्याविषयी कृतज्ञता आणि त्याच्या सेवनाने आपले स्वास्थ्य उत्तम राखले जाईल असा विश्वास निर्माण करण्यासाठी 'मुखी घास घेता करावा विचार...... '