Your Mental Wellness Matters
Mon - Sat | 10:00 AM - 6:00 PM

अज्ञानातील आनंदाची अनुभूती 🥳

Author: Piyusha Samant | Published: 23 Aug 2026


नेहमीच सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असणे ही एक वाईट सवय ठरू शकते. गप्पा-टप्पा, चौकशी किंवा अफवांतून (gossip) अनेकदा अशी अनावश्यक माहिती मिळते, ज्यामुळे तणाव निर्माण होतो. काही गोष्टींची माहिती नसणे हे कधीकधी मनःशांती आणि स्थिरता देऊ शकते. जेव्हा आपल्याला एखाद्या संकटाची कल्पना नसते, तेव्हा आपले मन शांत असते; परंतु एकदा का आपल्याला त्याबद्दल समजते, तेव्हा मात्र अस्वस्थता किंवा तणाव निर्माण होतो.

आव्हानांचा थेट सामना करताना 'अज्ञान' आपल्याला एक प्रकारचे बळ देऊ शकते आणि उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद जास्त परिणामकारकही ठरतो. याउलट, परिस्थितीचे सतत विश्लेषण आणि आकलन करत राहिल्याने स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका आणि अनिश्चितता निर्माण होऊ शकते.

मानवी स्वभावामुळे, आपल्याशी संबंधित नसलेल्या घटना किंवा संभाषणांबद्दलची उत्सुकता रोखणे अनेकदा कठीण जाते. सोशल मीडिया ह्याच तर मानसिक यंत्रणेचा गैरफायदा घेत आहे. खरंतर तंत्रज्ञान हा मानवी बुद्धिमत्तेचाच आविष्कार आहे मात्र त्याचा वापर करताना तिच बुद्धिमत्ता वापरणं अवघड होऊन बसतं. अशावेळी विवेकबुद्धी जागृत ठेवणं याशिवाय तरणोपाय नाही.

जेव्हा गोष्टींचा आपल्याशी काहीही संबंध नसतो, तेव्हा अज्ञान फायदेशीर ठरू शकते. मात्र, जेव्हा एखादी बाब आपल्यावर थेट परिणाम करणारी असते, तेव्हा त्याबद्दल माहिती असणे केव्हाही फायद्यचेच पण अति तेथे माती चा अनुभव इथेही लागू होतो. योग्य-अयोग्य पारखण्याची क्षमता विकसित केल्यास, महत्त्वाची माहिती प्राधान्याने निवडण्यास आणि मनःशांती टिकवून ठेवण्यास मदत होते.